अनेकांना मासेमारी करण्याचा छंद असतो. मात्र हा छंद चेन्नईच्या एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. मासेमारी करताना तलावात किंवा नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी ऐकल्या असतील. पण चेन्नईमध्ये मासा सापडल्यानंतर युवकाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे.
चेन्नईच्या मदुरंतकम येथे २९ वर्षीय मणिकंदन किलावलम तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता. तलावाच्या उथळ पाण्यात उभे राहून हातांनी मासे पकडण्याचा प्रयत्न करत असताना मणिकंदनच्या हाती दोन मासे लागले. मणिकंदन तलावातील कमी खोली असलेल्या पाण्यात उतरला होता. तो नेहमीप्रमाणे हाताने मासे पकडू लागला. त्याने दोन मासे पकडले. मासे प्रचंड चपळ असतात. हातातून निसटतात. त्यामुळे तो त्यांना तोंडात पकडायचा, जेणेकरून ते सहज निसटणार नाहीत.
मणिकंदनने एक मासा तोंडात धरला आणि दुसरा मासा पकडण्यासाठी खाली वाकला. पण, त्याचवेळी तोंडात धरला मासा तडफड केली आणि त्याच्या घशात गेला आणि फसला. पनंगोट्टई असे या माशाचे नाव आहे. या माशाच्या पाठीवर काटे असतात. हे काटे मणिकंदनच्या श्वसन नलिकेमध्ये फसले. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. एका माश्याला तोंडात धरून दुसरा मासा पकडत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मणिकंदन हा नेहमी मित्रांसह मासेमारी करण्यासाठी जात असे. मात्र मंगळवारी (८ एप्रिल) मणिकंदन एकटाच मासे पकडायला गेला होता. मदतीला कुणीही नसल्याने त्याने सापडलेला मासा गमवू नये यासाठी तोंडात धरला तर दुसऱ्या हाताने पुन्हा पाण्यातील मासा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोंडात धरलेल्या मासा तडफडू लागला व त्याने तोडांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. माशाचे डोके आतल्या बाजूला असल्यामुळे तो थेट घशात गेला आणि मणिकंदनच्या श्वसननलिकेत अडकून बसला. श्वसननलिकेत मासा अडकल्यामुळे मणिकंदनला श्वास घेण्यास अडचण होऊ लागली. तो तात्काळ तलावातून बाहेर येत तोंडातील मासा काढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला यश आले नाही.
तलावानजीक मदतीसाठी कुणीही नसल्याने मणिकंदन जवळच असलेल्या गावात पळत सुटला. मात्र तोपर्यंत श्वास अडकल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला. काही वेळाने स्थानिकांनी त्याच्या घशातून मासा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही यात यश आले नाही. मणिकंदनला चेंगलपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मणिकंदन हा रोजंदारीवर काम करणारा मजूर होता. तलावात तो अनेकदा मासेमारी करताना आढळायचा. मोकळ्या हातांनी मासे पकडण्यात तो तरबेज होता. त्याच्याबरोबर मासेमारी करताना त्याचे मित्र असायचे, ज्यांना तो मासे पकडून देत असे. मात्र त्यादिवशी त्याच्याबरोबर कुणीच नसल्याने त्याने तोंडात मासा धरला आणि तिथेच घात झाला.