(नाशिक)
राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा रंगत असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चर्चांवर काही प्रमाणात स्पष्टता दिली आहे. मुंबईत झालेल्या ‘मराठीचा विजयी मेळावा’बाबत त्यांनी सांगितले की, हा मेळावा केवळ मराठी भाषेच्या मुद्द्यावर आधारित होता आणि त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान युतीसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आलेल्या राज ठाकरे यांनी अनौपचारिक संवादात हे वक्तव्य केले. राज्यात महायुती सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय लागू केल्यानंतर, त्याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आवाज उठवला होता. या विरोधानंतर संबंधित आदेश मागे घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबईत दोघेही पहिल्यांदाच एकत्र व्यासपीठावर आले होते, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही बंधू एकत्र येणार का, याची चर्चा सुरु झाली होती.
या वेळी उद्धव ठाकरे यांनी, “आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच,” असे सांगत संभाव्य युतीचे संकेत दिले होते. “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल,” असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची युती होण्याच्या शक्यता वाढल्या. तथापि, राज ठाकरे मात्र याबाबतीत अधिक सावध भूमिका घेत असल्याचे दिसते. सध्याच्या सरकारने हिंदी सक्ती संदर्भात जीआर (शासन निर्णय) काढला असला, तरी मागील सरकारने केवळ अहवाल स्वीकारला होता, मात्र त्यावर अंमलबजावणी केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
नोव्हेंबरमध्ये युतीचे चित्र स्पष्ट होणार
राज ठाकरे म्हणाले की, “मराठीचा विजयी मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्यावर होता. त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान युतीसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.” या वक्तव्यामुळे युतीबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.