(रत्नागिरी / प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मित्रपक्षांची महायुती एकत्रितपणे लढविणार असल्याचा निर्णय शिंदेसेनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी मंगळवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सुदेश मयेकर यांच्यासह शिंदेसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सोमवारी (दि. २१) पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामगृहात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्व स्तरांवरील निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचे ठरले असल्याचे पंडित यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक विचारले असता, पंडित म्हणाले, “हा निर्णय शिंदेसेनेच्या बैठकीत झाला आहे. इतर घटक पक्षांच्याही वरिष्ठ पातळीवर बैठकांना वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कोकणाकडे विशेष लक्ष असून, त्यांची पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्यासमवेत बैठकही नुकतीच झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच युतीची ताकद दाखवण्याचा निर्धार शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.