(मुंबई)
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर इतर भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासन सजग झाले असून काही भागांत अलर्ट जारी करण्यात आले आहेत
गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला. विशेषतः उपनगरांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी खरीप पिकांची पेरणी धोक्यात आली होती. मात्र, या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, मुग, उडीद आणि हळदीसारख्या खरीप पिकांना चांगला आधार मिळेल. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
मुंबईतही पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये अधिक पाऊस पडतो आहे. सलग काही दिवस उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी हा पाऊस काहीसा दिलासा देणारा आहे.
हवामान विभागाने ज्या भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे, त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याचा समावेश ‘अतिमुसळधार पाऊस’ असलेल्या भागांमध्ये होतो. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नदी, ओढ्यांचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्या ठिकाणी अनावश्यक हालचाल टाळावी. बचाव पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यक ते ठिकाणी यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचनांनुसार आवश्यक ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पावसामुळे शाळा, महाविद्यालये, वाहतूक व्यवस्था यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतत हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या अप्रमाणित माहितीपासून दूर राहावे.
पावसाचा जोर कायम राहणार असल्याने, नागरिकांनी आपली सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवास आणि इतर बाह्य हालचाली मर्यादित ठेवाव्यात, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, आणि आवश्यकतेनुसार मदत केंद्रांशी संपर्क साधावा.