पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात राहणारा रवींद्रनाथ नावाचा एक साधा मच्छीमार… तो आपल्या १५ साथीदारांसह बंगालच्या उपसागरात, हल्दियाजवळ मासेमारीसाठी गेला होता. सुरुवात नेहमीसारखीच शांत होती, पण निसर्गाच्या मनांत काही वेगळंच होतं.
अचानक समुद्राचे रूप बदलले… आकाश काळंठक्क झालं…जोरदार वारे वाहू लागले… लाटा बेभान उसळू लागल्या… आणि पाहता पाहता त्यांचे ट्रॉलर उलटले. सर्वजण समुद्रात फेकले गेले… त्यात रवींद्रनाथसुद्धा.
(घटनेचा व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी)

मात्र, रवींद्रनाथ घाबरणारा नव्हता, धीट होता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचं शत्रू नव्हतं, तर साथी होतं. त्याने हार मानली नाही. तो पोहत राहिला… आणि पोहतच राहिला… वर फक्त निळं आकाश, खाली अथांग सागर. तास गेले, दिवस सरले…
तब्बल पाच दिवस!
पाच दिवस रवींद्रनाथ एकटाच समुद्रात पोहत होता. ना अन्न, ना पिण्याचं पाणी… फक्त जगण्याची असाधारण जिद्द. पावसाचं पाणी त्याचं जीवन बनलं. सूर्याची आग, रात्रीचा अंधार, थकवा, तहान, मृत्यूचा सततचा धसका, तरीही त्याची उमेद अखेरपर्यंत टिकून होती.
पाचव्या दिवशी… सुमारे ६०० किमी दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, ‘एम.व्ही. जवाद’ हे व्यापारी जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काहीतरी हलताना पाहिलं. नीट पाहिलं, तर एक माणूस पोहत होता! कॅप्टनने लगेच लाइफ जॅकेट फेकलं, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी धर्म, देश, सीमा सगळं बाजूला ठेवलं, समोर फक्त एक गोष्ट होती… माणूस.
काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला. यावेळी जहाज त्याच्याकडे वळवण्यात आलं. पुन्हा एकदा लाइफ जॅकेट फेकण्यात आलं — आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं! क्रेनच्या सहाय्याने त्याला जहाजावर ओढून घेतलं. तो थकलेला होता, अर्धमेला… पण जिवंत होता.
जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण खलाशांनी आनंदात जल्लोष केला. त्यांनी केवळ एक माणूस वाचवला नव्हता तर त्यांनी माणुसकीला वाचवलं होतं. त्याक्षणीचा हा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला होता. ही घटना जुनी आहे, मात्र आजही हे दृश्य प्रत्येक पाहणाऱ्याच्या काळजाला हलवून जातं…
❤️
थँक यू जहाज ‘एम.व्ही. जवाद’ आणि त्यावरील प्रत्येक खलाशासाठी, तुम्ही एक जीव वाचवला नाही, तर जगाला हे दाखवून दिलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे….

