(मुंबई)
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इंधन दरवाढीचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, किराणा, ऑनलाइन फूड डिलिव्हरी, रेस्टॉरंट व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होऊ लागला असून सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूकदार, शेतकरी, व्यापारी आणि डिलिव्हरी पार्टनर्स यांनीही वाढत्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडेच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे तीन रुपयांची वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. या वाढीनंतर मालवाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट बाजारपेठेवर दिसू लागला आहे.
भारतामध्ये सुमारे ६५ टक्के मालवाहतूक रस्तेमार्गे केली जाते. ग्रामीण भागातून शहरांकडे भाजीपाला, फळे, दूध, धान्य आणि किराणा माल ट्रक, टेम्पो आणि पिकअप वाहनांद्वारे पोहोचवला जातो. डिझेल हे या वाहनांचे मुख्य इंधन असल्याने वाहतूक खर्च झपाट्याने वाढत आहे. वाहतूकदारांच्या मते, एका ट्रकच्या फेरीमागे हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च येत असून त्याचा भार अखेरीस ग्राहकांवर पडत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, टोमॅटो, कांदा, बटाटा, हिरव्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. उन्हाळ्यात आधीच काही भाज्यांचे उत्पादन कमी असताना वाहतूक खर्च वाढल्याने किरकोळ बाजारातील दर आणखी वाढू शकतात. मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये बाहेरील जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर माल येत असल्याने महागाईचा परिणाम अधिक जाणवू शकतो.
दुधाच्या दरवाढीचाही सर्वसामान्य कुटुंबांना फटका बसू लागला आहे. प्रमुख दुग्ध ब्रँड्सनी प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ जाहीर केली असून पशुखाद्य, पॅकेजिंग आणि इंधन खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती खर्चाचे गणित आणखी बिघडण्याची शक्यता आहे. भाजीपाला बाजारात आणण्यासाठी वाहतूक खर्च हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, डिझेलचे दर वाढल्यामुळे प्रत्येक ट्रिपमागचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरत आहे, असे भाजीपाला वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. स्विग्गी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सनी वाढत्या पेट्रोल खर्चाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “दिवसभर बाइकवर काम करावे लागते. पेट्रोल दरवाढीनंतर खर्च खूप वाढला आहे, पण कमिशन वाढलेले नाही,” अशी प्रतिक्रिया डिलिव्हरी पार्टनर देत आहेत. लहान हॉटेल, क्लाऊड किचन आणि खाद्य व्यवसायिकांनाही वाढत्या खर्चाचा फटका बसत आहे. एलपीजी, खाद्यतेल, भाज्या आणि डिलिव्हरी खर्च वाढल्याने अनेक व्यावसायिक मेन्यू दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.
एकूणच, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून फूड डिलिव्हरीपर्यंत सर्वच क्षेत्रांवर आर्थिक दबाव वाढताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने इंधनावरील करांमध्ये दिलासा दिल्यास महागाई काही प्रमाणात नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

