(राजापूर /रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथील एच.पी. प्रसन्न पेट्रोलपंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १६ जून २०२६) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर रंगाची होंडा ऍकॉर्ड कार (एमएच-०१-एआर-३१९७) ओणी येथील एच.पी. प्रसन्न पेट्रोलपंपातून बाहेर पडून मुंबई-गोवा महामार्गावर येत होती. यावेळी कारचालकाने महामार्गावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष करत वाहन थेट राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये आणल्याने समोरून येणाऱ्या युनिकॉर्न दुचाकीला (एमएच-०५-एफडी-५१९४) जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकीस्वार जियाउलहक रफीक अन्सारी (वय २७, रा. बोकारो, झारखंड) याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी हलविण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी समीर भास्कर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहूल चमणलाल मेहरा (वय ५०, रा. वसई, जि. पालघर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर वाहन चालविताना आवश्यक ती दक्षता न घेतल्यामुळे एका तरुणाचा जीव गेल्याने वाहनचालकांच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

