(चिपळूण)
शहराचे जागृत ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक किरका (जत्रा) मिरवणूक आज ( बुधवार, दि. १६ जुलै २०२५) रोजी भक्तिभावाने साजरी केली जाणार आहे. ही पारंपरिक सवाद्य मिरवणूक दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत चिपळूण शहराच्या चतु:सीमेत फिरवली जाणार आहे.
मिरवणुकीपूर्वी दुपारी २.१५ वाजता श्री मंदिरात किरका मांड भरण्याचा धार्मिक विधी पार पाडण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता मंदिरातून सवाद्य मिरवणूक निघेल. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून साजशृंगार केलेल्या पालखीचा उत्साहात फेरफटका होईल आणि सायंकाळी ६ वाजता श्री दत्त मंदिर, खेर्डी (चिपळूण दक्षिण सीमा) येथे मिरवणुकीची सांगता होईल.
देवस्थानचे सर्व मानकरी, सेवेकरी, भैरवसेवक, कार्यकर्ते तसेच चिपळूणकर भाविक नागरिकांनी या पवित्र मिरवणुकीत श्रद्धेने सहभागी व्हावे व आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.
किरका जत्रा निमित्ताने, चिपळूण शहरातील संबंधित पारंपरिक मंदिरे, देवस्थाने, दर्गे, पीर यांचे गुरव, पुजारी, मुल्लाजी यांनी आपापल्या देवस्थानांचा नैवेद्य शिधा मंगळवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री काळभैरव मंदिरात पोहोचवावा, असे आवाहन श्री जुना काळभैरव देवस्थान, चिपळूण विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.