(दापोली /रत्नागिरी)
जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, फसवणुकीनंतर स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल जानराव जाधव (वय ५९, रा. जालगाव पांगारवाडी, प्रियदर्शनी अपार्टमेंट, ता. दापोली) यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला होता. आरोपींनी स्वतःला जुन्या नाण्यांच्या व्यवहाराशी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यातील जुन्या नाण्यांची खरेदी करून त्याबदल्यात मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडलेल्या जाधव यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार विविध कारणांसाठी वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार, गुगल पे तसेच आरटीजीएसद्वारे मोठ्या प्रमाणावर रक्कम भरली. मात्र, भरलेली रक्कम परत मिळाली नाही किंवा कोणताही लाभही प्राप्त झाला नाही. उलट अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींना वारंवार पैसे परत करण्याची मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नाही. याच काळात उमाकांत पांडे नावाच्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे फसवणुकीसोबतच तोतयागिरीचाही गंभीर मुद्दा समोर आला आहे.
या प्रकरणी साहिल कुमार, विशाल सिंग आणि उमाकांत पांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. ऑनलाइन गुंतवणूक, दुर्मिळ नाणी किंवा ऐतिहासिक वस्तूंवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून वाढत्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने नागरिकांनी अशा व्यवहारांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

