(मुंबई)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे निधन झाले. काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील भाजपला एक अनुभवी, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व गमवाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
राज के. पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी यश संपादन केले होते. युती सरकारच्या काळात (१९९५–१९९९) त्यांनी कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले आणि मुंबईत भाजपचा विस्तार घडवून आणला. विशेषतः मुंबईतील राजस्थानी आणि मारवाडी समाजाला भाजपशी जोडण्यात त्यांचे मोठे योगदान होते. पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी निष्ठेने पक्षाची साथ सोडली नाही.
स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक शैली ही राज के. पुरोहित यांची ओळख होती. विधानसभेत जनतेचे प्रश्न ठामपणे मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मजबूत पकड होती. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते ‘राजभाई’ म्हणून ओळखले जात.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, मुंबईच्या विकासात आणि पक्षवाढीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे म्हटले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

