(खेड / रत्नागिरी)
तालुक्यातील घाणेखुंट-गवळीवाडी फाट्यानजीक भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार व त्याचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने संताप व्यक्त होत असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत सिताराम चव्हाण (वय ५७, रा. घाणेखुंट धापसेवाडी, ता. खेड) हे आपल्या मुलासह बजाज प्लॅटिना दुचाकीने घरडा कंपनीच्या दिशेने जात होते. ३१ मे रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास घाणेखुंट-गवळीवाडी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. फिर्यादीनुसार, आरोपी संतोष होळकर याने त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एमएच-०८-बीके-०२२६) भरधाव व निष्काळजीपणे चालवत मुख्य रस्त्यावरून अचानक गवळीवाडीच्या रस्त्याकडे वाहन वळविले. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाला.
या अपघातात शशिकांत चव्हाण यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली, तर डाव्या नितंबाजवळ गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या मुलाच्या डाव्या हाताच्या मनगटाला मार लागला असून छातीच्या उजव्या बाजूच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.
अपघातानंतर जखमींना मदत न करता चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संतोष होळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेफाम वाहनचालकांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत असताना, या घटनेने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

