(मुंबई)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येताच ठाकरे गटाने तातडीने राजकीय आणि कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही खासदार सध्या दिल्लीत असून ते लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. या भेटीदरम्यान स्वतंत्र गटाच्या समर्थनाबाबत पत्र सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून फुटीर खासदारांविरोधात अपात्रतेसह विविध पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाची तातडीची बैठक गुरुवारी (१८ जून) सकाळी ११ वाजता संसद भवनातील संविधान सदन येथील कार्यालय क्रमांक १२८-ए येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व लोकसभा सदस्यांना अनिवार्य उपस्थितीचे निर्देश देत अधिकृत व्हीप जारी करण्यात आला आहे.
पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व खासदारांनी सक्तीने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, दिल्लीत शिंदे गट आणि ठाकरे गटातील काही खासदारांमध्ये गुप्त बैठका झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाने जारी केलेला हा व्हीप केवळ संघटनात्मक निर्णय नसून संभाव्य बंडखोरांवर कायदेशीर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
विशेष म्हणजे, बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांविरोधात पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई किंवा अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेनेतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

