(रत्नागिरी)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध रत्नागिरीत संभाजी ब्रिगेड आणि बहुजनवादी संघटनांकडून आज (मंगळवार) तीव्र शब्दांत व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा (एमपीडीए) रद्द करण्याचीही मागणी करत, यावरही जोरदार आक्षेप नोंदवला.
निषेध कार्यक्रमाची सुरुवात शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाली. येथे बहुजनवादी विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी एकमताने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. याचबरोबर दिपक काटे या हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, जन सुरक्षा कायद्याच्या दुरुपयोगाचा धिक्कार करण्यात आला.
नंतर, निषेध मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी निवासी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे माजी कोकण प्रदेश संघटक प्रवीण कोळापटे, बहुजनवादी नेते बाळा कचरे, सचिन भातडे, सुरेंद्र शेट्ये, संजय पावसकर, अभय आगरे, दिपक जोगळे, विशाल जाधव, महेंद्र वालम, विशाल मांडवकर, सुरेंद्र गुड्ये, एस. व्ही. पवार, मिलिंद नार्वेकर आदींचा समावेश होता.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात, लोकशाही व्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत, बहुजन नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही ठाम भूमिका मांडली.