(पाली / वार्ताहर)
तालुक्यातील विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी चारसूत्री भात लागवड आणि ठोंबा पद्धतीने नाचणी लागवड या विषयांवर प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वळके येथे भात लागवडीचे प्रात्यक्षिक
वळके येथील शेतकरी सुवेद शिवगण यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक पार पडले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच उत्तम सावंत, सदस्य माधुरी सावंत, सुभाष सावंत, उषा सावंत, तसेच ग्रा.पं. अधिकारी श्री. दळवी यांची उपस्थिती होती.
गावातील नागरिकांना कृषी विभागाच्या विविध योजना आणि सेंद्रिय शेतीच्या फायदे याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी खानू गावातही चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. शेतकरी श्रीम. सुवारे व सौरभ सुवारे यांचा सहभाग लाभला. याचवेळी खरिप हंगामासाठी पीक स्पर्धक म्हणून संभाजी सुवारे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर हळद लागवडीचे प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले. ही संपूर्ण मोहिम महाकृषी ॲपवर नोंदवण्यात आली.
वेतोशी येथे ठोंबा पद्धतीने नाचणी लागवड
समृद्धी शेतकरी गट, वेतोशी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नाचणी पीकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये ठोंबा पद्धतीने नाचणीची लागवड करण्यात आली. यावेळी खत व्यवस्थापन, कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. सहायक कृषी अधिकारी सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले.
वेळवंड येथे नाचणी बियाण्याची पुनर्लागवड
वेळवंड येथील शेतकरी तुकाराम रत्नाकर भायजे यांच्या प्रक्षेत्रावर जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळालेल्या बियाण्यांची पुनर्लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ऍग्रीस्टॅक, तसेच माती परीक्षण योजने विषयी माहिती देण्यात आली. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहायक कृषी अधिकारी सागर सांगवे व अजय कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन दिले.