(रत्नागिरी)
राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेल्या विस्कळीततेवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. यासंदर्भात बजरंग दल दक्षिण रत्नागिरीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबोधित निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, दहावीचा निकाल १३ मे रोजी लागूनही आजपर्यंत केवळ दोन फेरयादी प्रसिद्ध झाल्याअसून, त्यातून ४० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात संभ्रमात असून, तणाव वाढत चालला आहे. दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक विद्यार्थी अभावी रिकामे बसले आहेत. “सेवा, सुरक्षा आणि संस्कार” या त्रिसूत्रीवर कार्य करणारे बजरंग दल, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर मानत असून, राज्य शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. देशाच्या विकासासाठी युवकांचे मनुष्यबळ सक्षम होणे आवश्यक असून, प्रवेश प्रक्रियेतील अडचणी त्याला बाधा ठरत आहेत, असा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला.
घरबसल्या प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन प्रणाली राबवण्यात आली असली तरी ती विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत सक्षम नाही. त्यामुळे प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अजूनही वाट पाहावी लागत असल्याने शैक्षणिक वर्षाची अनिश्चितता अधिकच गडद झाली आहे.
आठवडाभरात तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा
या समस्येवर त्वरित लक्ष न दिल्यास आठवड्याभरात बजरंग दलाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देताना बजरंग दल दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा संयोजक विराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे अधिवक्ता सचिन रेमणे, गौरव झगडे आदी उपस्थित होते.