(रत्नागिरी)
राज्यभरात मोठ्या विरोधाला सामोरे जात एसटी महामंडळाने जानेवारीमध्ये केलेली भाडेवाढ सध्या रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नात मोठ्या वाढीचे कारण ठरली आहे. मागील चार महिन्यांत आगाराच्या तिजोरीत तब्बल दीड कोटींची भर पडली आहे.
गत २५ जानेवारीपासून महामंडळाने डिझेल, चेसिस, टायर आदी खर्चवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या बससेवांमध्ये सरासरी १४.९५ टक्क्यांची वाढ केली. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसला. अनेक प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला, मात्र महामंडळाने निर्णय कायम ठेवला. त्याचा परिणाम म्हणजे रत्नागिरी आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात जवळपास दोन लाखांची वाढ झाली. पूर्वी दररोज सरासरी ९ लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या आगाराला आता ११ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासात खिशाला कात्री
एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून, रत्नागिरी ते मुंबईसाठी आता ६०४ रुपये मोजावे लागत आहेत. बोरिवलीसाठी ६३९, पुण्यासाठी ५४९ ते ६९५, तुळजापूर व अक्कलकोटसाठी ७५०, तर लांजा-धाराशिव प्रवासासाठी तब्बल ६६० रुपये आकारले जात आहेत.
ग्रामीण भागात एसटीचीच पसंती
भाडेवाढ झाली असली तरी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‘लालपरी’ अजूनही जीवनवाहिनीच आहे. मुख्य गावांमध्ये ये-जा करण्यासाठी ग्रामस्थ एसटी सेवेलाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या तरी महामंडळाची गाडी आर्थिकदृष्ट्या काहीशी रुळावर असल्याचे चित्र आहे.

