(तरवळ / अमित जाधव)
“रत्नागिरी 24 न्यूज” ने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. तरवळ येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवळी-जयगड महामार्गावरील धोकादायक खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविल्याची बातमी 24 न्यूज डिजिटल मिडियावर प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत तत्काळ काम हाती घेतले.
करबुडे फाटा, तिवराड फाटा या ठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात आले असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी १० कामगार, मुकादम, डंपर आणि रोलर अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
सध्या पावसाळा असल्यामुळे डांबर प्लांट बंद आहे. त्यामुळे जांभा दगड ग्रीड रोलरने दाबून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून पाऊस ओसरल्यानंतर डांबर टाकून हे काम कायमस्वरूपी पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (उत्तर रत्नागिरी) यांनी दिली.
दरम्यान, निवळी-जयगड महामार्गावर अवजड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ता सतत खराब होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून, वाहने हळू चालवावीत आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.