(कोल्हापूर)
कोल्हापूरकरांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. नांदणी मठातील प्रिय महादेवी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वनताराचे सीईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती भट्टारक पट्टाचार्य जीनसेन महाराज यांची बैठक कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये पार पडली. या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राहुल आवाडेही उपस्थित होते. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या चर्चेनंतर वनतारा प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करत कोल्हापूरकरांची आणि नांदणी मठाची मन:पूर्वक माफी मागितली. सीईओ विहान कर्णीक यांनी सांगितले की, “माधुरी हत्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या भावनांशी जोडलेली आहे. तिला लवकरच परत कोल्हापुरात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. महाराष्ट्र सरकार, वनतारा आणि नांदणी मठ मिळून कोर्टाला विनंती करून हा प्रश्न मार्गी लावणार आहोत.”
यानंतर भट्टारक पट्टाचार्य जीनसेन महाराज म्हणाले, “वनताराचे अधिकारी आणि नांदणी मठाची बैठक सकारात्मक झाली. हत्तीणीच्या काळजीसाठी वनतारा प्रशासनाने पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. आम्ही अनंत अंबानी आणि वनतारा टीमचे आभारी आहोत. पुढील काही दिवसांत माधुरी हत्ती पुन्हा नांदणी मठात दिसेल, अशी आम्हाला खात्री आहे.”
महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी गेल्या काही दिवसांत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या रोषामुळेच वनताराला मागे हटावे लागले. अखेर या निर्णयामुळे कोल्हापुरकरांचा विजय निश्चित झाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.