(देवरूख / सुरेश सप्रे)
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत संगमेश्वर तालुक्यातील जि.प. शाळा कोंडकदमराव-आंबव येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कु. ईश्वरी जयदीप पेंढारी हिने घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल तिचा प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
हा सत्कार प्रबोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव श्री. प्रद्युम्न रवींद्र माने यांच्या हस्ते संपन्न झाला. सत्कार समारंभ प्रबोधन संस्था, आंबव येथे पार पडला.
कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालकवर्ग तसेच प्रबोधन संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवत्तायादीतील स्थान मिळवून परिसरात गौरव वाढवणाऱ्या ईश्वरीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.