(दापोली)
पावसाळा सुरू होताच कोकणातील कातळसड्यांवर फुलांची उधळण पाहायला मिळते. दापोली तालुक्यातील महामाई नगर, बुरोंडी परिसरातील पठारही सध्या अशाच रंगीबेरंगी फुलांनी नटले असून, या जैवविविधतेच्या सौंदर्याकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने ‘दिपकाडी महोत्सव’ साजरा करण्यात आला.
जुन्या काळी अस्तित्वातून नष्ट झाल्याचे मानले जाणारे Dipcadi concanense म्हणजेच “दिपकाडी” हे दुर्मीळ फूल पुन्हा दापोलीतील कातळसड्यांवर बहरले असून, याचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटी, वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर आणि ही रिसर्च दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही वनस्पती पश्चिम घाटातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात आढळते. १८५० मध्ये डॅलझेल यांनी तिचे शास्त्रीय वर्णन प्रथम नोंदवले. IUCN च्या यादीत ‘संकटग्रस्त’ या दर्जा असलेली ही वनस्पती पावसाळ्यात ओलसर पठारांवर बहरते. शोभेच्या उपयोगाबरोबरच ही जैवविविधतेसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या वनस्पतीच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करून कातळसडे वाचवण्याचा निर्धार उपक्रमातून करण्यात आला. यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय होता. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमासाठी उपविभागीय कार्यालयाच्या वतीने पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. “पर्यटन वाढीसाठी असे उपक्रम आवश्यक आहेत,” असे सांगत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ यांनी, “दिपकाडी ही केवळ वनस्पती नाही, तर जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे. या वनस्पतीचे जतन करत दापोलीतील कातळसडे फुलांनी नटवणार आहोत,” असे आश्वासन दिले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्या ग्रामस्थांना पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या महोत्सवात उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, वनपाल रामदास खोत, डॉ. अमित मिरगळ, सुरेश खानविलकर, मिलिंद गोरिवले, सरपंच प्रीती म्हातले यांच्यासह ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

