(मुंबई / रामदास गमरे)
इलणे (ता. दापोली) येथील सुपुत्र व बॉम्बे हॉस्पिटलमधील सीनिअर टेक्निकल ऑफिसर श्री. विनोद सुदाम मोरे यांच्या सेवानिवृत्ती आणि वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात आणि भरगच्च गर्दीत पार पडला. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, मुंबई येथे १८ जून २०२५ रोजी संपन्न झाला.
बौद्धजन सेवा संघ, दापोली-मंडणगड-मुंबई, बौद्ध सेवा संघ (इलणे शाखा), बौद्धजन पंचायत समिती (मध्यवर्ती) यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव समारंभ घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरसेनानी आनंदराज आंबेडकर होते.
महामानवांना अभिवादन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विनोद मोरे आणि त्यांच्या पत्नी विशाखा मोरे यांनी सामूहिक दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी अत्यंत सुसंवाद आणि प्रभावी शैलीत केले.
कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि सरचिटणीस राजेश घाडगे यांनी विनोद मोरे यांच्या कार्याचा लेखाजोखा ‘जीवनपट’ म्हणून तयार केला, जो मंगेश पवार यांनी वाचून दाखवला. उपस्थित सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात श्री. मोरे यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
उल्लेखनीय कार्याचा गौरव
कार्यक्रमात अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी गौरवोद्गार काढताना सांगितले, “विनोद मोरे यांनी ३९ वर्षांच्या सेवेत माणसे जोडली, माणुसकी जपली आणि समाजकार्यात ठसा उमटवला. शासकीय सेवा, सामाजिक योगदान, शैक्षणिक कार्य, तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या इमारत उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान लक्षवेधी ठरले आहे.”
गावातील चिटणीस पदापासून ते मध्यवर्ती समितीच्या उपसभापती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले. समितीच्या नवनिर्मितीच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांनी ठाम भूमिका घेतली असून जनजागृतीसाठी त्यांनी कार्य केले, असेही आंबेडकर म्हणाले.
विनोद मोरे यांचे कुटुंब – आई सुरेखाताई मोरे, पत्नी विशाखा मोरे, तीन भाऊ, मुले, सुना, नातवंडे, तसेच इलणे गावचे ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी, बॉम्बे हॉस्पिटलचे सहकारी, आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉल अपुरा पडावा इतकी प्रचंड गर्दी उसळली होती.
इलणे सेवा संघाचे अध्यक्ष मोरे, अनिल मोहिते, दिलीप रुके, विकासक महेंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई चिटणीस सरदार भाई, सम्यक कोकण कला संस्थेचे मंदार कवाडे, बॉम्बे हॉस्पिटलचे सहकारी, आणि समितीच्या विविध घटकांनी आपल्या शुभेच्छा आणि भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांनी आभार मानले. शेवटी मंगेश पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता केली.

