(दापोली)
दापोली तालुक्यातील मादीवली गावचा युवा जिम्नॅस्ट नकुल भावेश कारेकर याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. अवघ्या १३ वर्षीय नकुलची २३ व २४ मे २०२६ रोजी हाँगकाँग (चीन) येथे होणाऱ्या ७ व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स वयोगट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचण्यांमध्ये नकुलने चौथा क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे, ही कामगिरी त्याने अलीकडेच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर केली आहे. शस्त्रक्रियेनंतर बहुतांश खेळाडूंना पुनरागमनासाठी मोठा कालावधी लागतो. मात्र नकुलने अल्पावधीतच सरावाला सुरुवात करत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. त्याची ही जिद्द आणि चिकाटी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.
नकुल सध्या पुण्यातील हिंजवडी येथे श्री स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक श्रीकांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत (१२ वर्षांखालील गट) त्याने सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली होती.
तसेच, आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने अंतिम फेरीत सहावा क्रमांक मिळवला होता. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून नकुल सातत्याने मेहनत घेत आहे.
नकुलच्या या यशाबद्दल त्याचे पालक, प्रशिक्षक तसेच स्थानिक क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अडचणींवर मात करत सातत्याने पुढे जाण्याची त्याची जिद्द हीच त्याच्या यशामागची खरी ताकद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

