(चिपळूण)
तालुक्यातील मिरजोळी कोलेखाजन येथे काही दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का बसून शेतकऱ्याच्या पाच दुभत्या म्हशी ठार झाल्याच्या प्रकारावर आता महावितरणने कारवाईची भूमिका घेतली आहे. हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन वायरमन मुदस्सर खान यांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल आमदार भास्कर जाधव यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधीद्वारे घेतली होती. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. घटना जून महिन्यात घडली. वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलेखाजन परिसरातील विद्युत तार तुटून जमिनीवर पडली. याच वेळी प्रमोद कदम यांच्या सहा दुभत्या म्हशींना त्या तारांचा जबर धक्का बसला. यात पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली होती.
दुसऱ्याच दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळवून दिली. यानुसार अधिकाऱ्यांनी भरपाई देण्याचे मान्य केले आणि काही प्रमाणात ती दिलीही गेली. मात्र, ही भरपाई अपुरी असून शेतकऱ्याचे झालेले नुकसान मोठे असल्याचा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत मांडत, मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांची दुर्लक्ष व घटनास्थळी न पोहोचल्याची बाब अधिवेशनात स्पष्टपणे उपस्थित करत, जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर महावितरणने वायरमन मुदस्सर खान यांचे निलंबन तर केलेच, शिवाय इतर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.