(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत दापोली परिसरात प्रथमच एक्सॉटिक भाजी ‘टर्निप’ची यशस्वी शेती करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रयोगाला चांगले यश मिळाले असून सध्या टर्निप विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी टर्निपसोबत नवलखवल, झुकिनी, कोबी, फुलकोबी, मधुमका, टोमॅटो, वांगी, मिरची, दुधी भोपळा, भोपळा, गवार, कलिंगड, काकडी, पडवळ, शिराळ, घोसाळ, घेवडा आणि भेंडी अशा विविध भाज्यांची लागवड केली आहे. यातील काही भाज्या सध्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून उर्वरित भाज्या लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
दापोलीकरांनी एक्सॉटिक भाज्यांचा ताजा व दर्जेदार पर्याय म्हणून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांना Nursery No. 10 येथे प्रत्यक्ष शेती पाहण्याची तसेच त्याच ठिकाणी थेट खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.
या उपक्रमामुळे एक्सॉटिक भाज्यांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार असून दापोली आणि कोकण परिसरातील भाजीपाला उत्पादनाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सलगम (Turnip) खाण्याचे काही महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
- सलगम कर्करोग प्रतिबंधात मदत करू शकतो.
- सलगम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
- सलगममध्ये दाहरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात.
- अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.
- सलगम हाडांच्या आरोग्यास आधार देतो.
- सलगममध्ये भरपूर प्रमाणात आहारतंतू (फायबर) असते.
- सलगम पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.
- सलगम वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतो.

