(संगमेश्वर)
आंबव (देवरुख) येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. एमरटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, लांजा रत्नागिरी यासारख्या शेतीआधारित उत्पादने, उपउत्पादने तयार करणे तसेच त्यांच्या व्यापारासाठी टेक्नॉलॉजी युक्त प्रणाली उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असणाऱ्या कंपन्यांशी हे सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन तसेच या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी याद्वारे प्राप्त होणार आहेत. प्र. शि. प्र. संस्थेच्या अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन तसेच फार्मसी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना या सामंजस्य कराराचा लाभ मिळणार आहे. सेमिनारच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने, सीईओ श्री. प्रद्युम्न माने, सौ. ईशानी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उप प्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, एमरटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक गौरव सोमवंशी, जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचे संचालक मिथिलेश देसाई तसेच इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे ई. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर श्री. प्रद्युम्न माने यांच्याहस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि, वेगाने विकसित होणाऱ्या जागतिक तंत्रज्ञानानुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने उत्पादन करण्याची गरज बनली असून त्यासाठी स्टार्ट अप, इन्क्युबेशन सेंटर ची मोठी भूमिका असणार आहे. यासाठी महाविद्यालये व कंपन्यांमधील करार उपयुक्त ठरू शकतात.
श्री. प्रद्युम्न माने यांनी आपल्या भाषणात मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. कोकणात पिकणारी शेती व आंबा, फणस , काजू सारखी फळे या संबंधी उत्पादने व व्यवसायामध्ये भरपूर संधी आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातहि व्यवसायासंबंधी खूप चांगल्या कल्पना येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांशी सामंजस्य कराराच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.
यानंतर मिथिलेश देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या कंपनीच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले कि तब्बल ८६ प्रजातीची १५०० फणसाची लागवड त्यांनी केली असून त्याधारित उपउत्पादने निर्माण करण्यात येत आहेत. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रसायन विरहित माती उपलब्ध असून त्यामध्ये फणस व इतर फलोत्पादनाला खूप वाव आहे. तसेच त्यासाठी अत्याधुनिक यंत्रे तयार करण्याचीहि फार आवश्यकता असणार आहे. सामंजस्य करारामुळे माहिती व तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ होऊन त्यासाठी मदत मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
गौरव सोमवंशी यांनी विस्तृतपणे आपल्या कंपनीची माहिती दिली. त्यांनी स्वतः कॉम्प्युटर इंजिनीअरिंग नंतर आय आय एम लखनौ मधून एम बी ए पूर्ण केल्यानंतर छत्तीसगढ सरकारसाठी तेथील सामाजिक सोयी सुविधा पुरविताना सुसूत्रता आणण्यासाठी एआय व ब्लॉकचेन आधारित प्रणाली बनविण्याचे काम केले. त्यानंतर स्वतःची एन जी ओ स्थापन केली. त्यामाध्यमातून ते शेती आणि कापूस ते अणु डेटापर्यंतच्या जटिल पुरवठा साखळ्यांमध्ये ट्रेसेबिलिटी आणि अनुपालन प्रदान करणारे प्लॅटफॉर्म तयार करीत आहेत. त्यांनी त्यांचे ब्लॉकचेन काम देशाचे पंतप्रधान तसेच काही सर्वात प्रभावशाली व्यवसाय आणि सरकारमधील नेत्यांसमोर सादर केले आहे. त्यांची या विषयावरील संशोधने व पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना दलाई लामा फेलो , सर्वोत्तम तंत्रज्ञान पुरस्कार, युथ आयकॉन यासारख्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. व्यवसायातील समस्या ओळखणे आणि त्या सोडविणे यासाठी संकल्पना आणि कौशल्ये हि दोन साधने अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इनोव्हेशन हे क्रमप्राप्त असून भविष्याची गरज असल्याचे सांगितले तसेच दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमादरम्यान जि. प. प्राथमिक शाळा आंबवची विद्यार्थिनी ईश्वरी पेंढारी हिचा इ. पाचवी स्कॉलरशीप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी किमान दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सचिन वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. राहूल वाटेगावकर यांचे नियोजनामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.

