(दापोली)
बेंगळूर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून “डिजिटल अॅरेस्ट”ची भीती दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.
याप्रकरणी मकरंद श्रीनिवास जोशी (वय 62, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. मुरुड खालचीपाखाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, 4 नोव्हेंबर 2025 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत आकाश शर्मा, शिवप्रकाश आणि दया नायक (पूर्ण पत्ता माहीत नाही) या व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला.
आरोपींनी आपण बेंगळूर पोलीस तसेच नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या नावाने कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथे खाते असून त्यातून 3 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खोटा आरोप केला. याची माहिती कुणालाही दिल्यास 50 लाख रुपयांचा दंड आणि डिजिटल अॅरेस्ट करण्यात येईल, अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादी यांच्यावर मानसिक दबाव टाकला. Signal अॅपद्वारे सातत्याने संपर्क साधून फसवणूक अधिक तीव्र करण्यात आली.
या भीतीपोटी आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांना अॅक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. या व्यवहारांद्वारे एकूण 1 कोटी 23 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 07/2026 अन्वये बी.एन.एस. कलम 318(2), 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी अटकेत नसून, दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

