(नवी दिल्ली)
देशात वाढत्या लठ्ठपणाच्या समस्या लक्षात घेता, केंद्र सरकार आता जंक फूडविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. सिगारेट आणि तंबाखूप्रमाणेच आता समोसा, जिलेबी, वडापाव आणि अशाच प्रकारच्या खाद्यपदार्थांवरही आरोग्यविषयक इशारा देणारी सूचना छापली जाणार आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि तरुणांमध्ये वजनवाढ यामागे जंक फूड हे मुख्य कारण ठरत असल्याने, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही महत्त्वाची पावले उचलण्याचे ठरवले आहे.
आरोग्य मंत्रालयाने ‘एआएमएमएस’ (AIIMS) आणि इतर काही केंद्रीय संस्थांना या संदर्भात पोस्टर्स आणि जनजागृती साहित्य तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या पोस्टर्समध्ये नाश्त्याच्या पदार्थांतील साखर आणि फॅटचे प्रमाण स्पष्टपणे नमूद केले जाईल. पहिल्यांदाच जंक फूडवर सिगारेटप्रमाणे इशारा देणारी सूचना बंधनकारक करण्याचा विचार केला जात आहे. या योजनेअंतर्गत लाडू, वडापाव, भजी, समोसा, जिलेबीसह इतर लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. लवकरच कॅफे, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी अशा इशाऱ्यांचे फलक लावले जाणार आहेत.
नागपूर येथील कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अमर अमाले म्हणाले, “साखर आणि फॅट्स हे नवे ‘तंबाखूजन्य’ घटक बनत आहेत. त्यामुळे आपण काय खात आहोत याची माहिती मिळवणे हा प्रत्येकाचा हक्क आहे.” आरोग्य तज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत भारतात ४४.९ कोटी लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाच्या समस्यांनी ग्रस्त असतील, असा अंदाज आहे. अमेरिकेनंतर या समस्येत भारताचा क्रमांक लागतो. डायबीटोलॉजिस्ट डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले, “सरकारचा उद्देश हे खाद्यपदार्थ बंद करणे नाही, तर लोकांना त्यातील पोषणमूल्यांची माहिती देणे हा आहे. जर एखाद्याला गुलाबजाममध्ये पाच चमचे साखर आहे हे माहित असेल, तर तो पुन्हा खाताना दोनदा विचार करेल.”
आरोग्य खात्याचा हा उपक्रम मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांविरुद्धच्या लढाईचा एक भाग आहे. हे आजार थेट साखर आणि तेल जास्त असलेल्या आहाराशी जोडलेले आहेत. हे बोर्ड सरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये बसवले जातील, अशी माहिती आहे.

