(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय (मांडकी-पालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मांडकी बुद्रुक येथे ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ तसेच ‘रानभाज्या पाककला स्पर्धेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. जि. प. श्री नेटकेश्वर विद्यामंदिर (मांडकी क्र. १) येथे कृषी कन्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रगत कृषी अवजारे, सुधारित वाण आणि कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली होती. या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शेतीतील बदलते तंत्रज्ञान, हवामान बदलाची आव्हाने आणि आधुनिक शेती पद्धतींचा स्वीकार करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी गुणधर्म आणि जैवविविधतेच्या संवर्धनातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. लोप पावत चाललेल्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मांडकीचे पोलिस पाटील सचिन खैर यांनी आपल्या मनोगतात कृषी कन्यांनी राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक ज्ञान मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व प्राध्यापिका, मांडकी बुद्रुकचे ग्रामसेवक योगेश सोनवणे, मांडकी खुर्दचे सरपंच सोनू धुमक, पोलिस पाटील संजय धुमक तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देत शेतकऱ्यांनी विविध कृषी विषयांची माहिती जाणून घेतली. कृषी कन्यांच्या या उपक्रमाचे तसेच दोन्ही महाविद्यालयांच्या ग्रामीण भागातील कृषी जनजागृतीसाठीच्या प्रयत्नांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

