(ठाणे)
पत्नीने भिसी भरण्यासाठी पतीकडे 50 हजार रुपयांची सतत मागणी केल्याने आणि त्यातून झालेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत पतीच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या पतीचे नाव मोहिद्दीन मो. सलीम अन्सारी (30) असून, आरोपी पत्नीचे नाव लुबना मोहिद्दीन अन्सारी (31) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिद्दीन हा आई आणि पत्नी लुबना यांच्यासह मुंब्रा येथे वास्तव्यास होता. लुबना हिचे मोहिद्दीनसोबत दुसरे लग्न होते.
प्रारंभी नारपोली पोलीस ठाण्यात मोहिद्दीन बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती, तर मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र मृत्यूनंतर मृताच्या आईने केलेल्या तक्रारीमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
मृताची आई जुबेदाखातुन मोहम्मद सलीम अन्सारी (58) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी लुबना ही भिसी भरण्यासाठी वारंवार मोहिद्दीनकडे पैशांची मागणी करत होती. या कारणावरून ती त्याला शारीरिक व मानसिक त्रास देत होती. तक्रारीनुसार, 4 डिसेंबर रोजी लुबना हिने मोहिद्दीनला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली आणि वाद घातला. तसेच पैसे न आणल्यास “कुठे जाऊन मर” असे अपमानास्पद शब्द तिने वापरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळूनच मोहिद्दीनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी करून पत्नी लुबना हिच्याविरोधात पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भान्यासं 2023 चे कलम 108 अंतर्गत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

