(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात सायबर गुन्हेगारीचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचा आभास निर्माण करून सायबर भामट्यांनी एका मेडिकल सेल्समनच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत तब्बल २ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. नाचणे रोड परिसरातील अभ्युदयनगर येथे घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्युदयनगर येथील रहिवासी नारायण दिनेश घोलप (वय ३४) हे २९ जुलै २०२६ रोजी सकाळी आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलमध्ये अचानक सिस्टीम अपडेटची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘गूगल आयपीटीव्ही’ नावाचे अज्ञात अॅप परस्पर डाउनलोड झाल्याचे निदर्शनास आले.
या अॅपच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच वेगवेगळ्या व्यवहारांतून अडीच लाख रुपये, तर बचत खात्यातून यूपीआयद्वारे ४ हजार २०० रुपये काढून घेतले. अशा प्रकारे अवघ्या काही क्षणांत २ लाख ५४ हजार २०० रुपयांचा आर्थिक फटका घोलप यांना बसला. मोबाईलमधून परस्पर रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच घोलप यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मोबाईलवर अचानक दिसणाऱ्या संशयास्पद अपडेट, अज्ञात लिंक किंवा अनोळखी अॅपवर विश्वास ठेवू नये. प्ले स्टोअर अथवा अॅप स्टोअर व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून एपीके फाईल डाउनलोड करणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच मोबाईलमध्ये संशयास्पद अॅप आढळल्यास तात्काळ इंटरनेट सेवा बंद करून संबंधित बँकेशी संपर्क साधत खाते सुरक्षित करावे. कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

