(रत्नागिरी / रायगड प्रतिनिधी)
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळ सुकेळी खिंड परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गेल्या १२ तासांहून अधिक काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुकेळी खिंड परिसरात सुमारे तीन फूटांपर्यंत पाणी साचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असून रात्र होताच अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली आहे. अनेक कुटुंबे लहान मुलांसह वाहनांमध्येच अडकून राहिल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी शक्यतो मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे नागोठणे–वाकण दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याची पातळी वाढल्याने दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. पाण्याचा निचरा न झाल्याने महामार्गावरून वाहनांची सुरक्षित हालचाल अशक्य बनली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक माणगाव–निजामपूर मार्गे ताम्हिणी घाटातून पुण्याकडे वळविली. त्यानंतर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करून वाहनांना पुढे सोडण्यात आले. मात्र, या पर्यायी मार्गामुळे वाहनचालकांचा प्रवास लांबला असून वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणासोबतच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न होणे ही समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी जलनिकासीची अपुरी व्यवस्था असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे वाहतूक विस्कळीत होत असल्याची नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली. माणगाव आणि कर्नाळा खिंड परिसरातही पाणी साचत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

