(नाशिक)
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील कथित लैंगिक अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) महत्त्वाची कारवाई केली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आठ गुन्ह्यांमध्ये स्वतंत्र दोषारोपत्रे नाशिक सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या संबंधित गुन्ह्यात सुमारे 1500 पानांचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी सर्व संशयितांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. पीडित महिला आणि साक्षीदारांच्या जबाबांसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत असून मध्यवर्ती कारागृहात आहेत.
आठ गुन्ह्यांमध्ये दोषारोपत्र दाखल
मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये रझा रफिक मेमन, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, तौसिफ बिलाल अत्तर, शफी शेख, दानिश शेख, निदा एजाज खान, असिफ अन्सारी आणि अश्विनी चैनानी यांच्यासह विविध संशयितांचा समावेश आहे. प्रत्येक गुन्ह्यातील पुरावे आणि जबाबांच्या आधारे स्वतंत्र दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
डिजिटल पुराव्यांचा समावेश
विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोषारोपत्रांमध्ये डिजिटल पुरावे, व्हॉट्सअॅप स्टेटस, इलेक्ट्रॉनिक डेटा तसेच पीडित आणि साक्षीदारांचे जबाब समाविष्ट करण्यात आले आहेत.
“महिला कर्मचाऱ्यांवरील कथित अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल आठ स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये सखोल तपास पूर्ण करण्यात आला आहे. प्रत्येक गुन्ह्यातील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे,” असे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले.

