(मुंबई)
शिवसेना पक्षाचे नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात गेल्या दीड वर्षांपासून कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, आता सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णायक सुनावणी होणार असल्याने दोन्ही गटांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
पार्श्वभूमी
निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने तीव्र विरोध करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
महापालिका निवडणुकीपूर्वी निर्णायक निर्णय?
२ जुलै २०२५ रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलै रोजी अंतिम सुनावणी घेण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे लवकरच होऊ घातलेल्या मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सुनावणीचा निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे, तसेच राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

