(लांजा /रत्नागिरी)
शाळेत दैनंदिन शासकीय कामकाज सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका व्यक्तीने शिक्षकावर धावून जात कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील वेरळ मराठी शाळेत घडली. एवढ्यावरच न थांबता संबंधित व्यक्तीने सहशिक्षकाची शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली, तसेच फिर्यादी शिक्षकाला धक्काबुक्की करीत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३, व्यवसाय शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ मराठी, रा. धावणेवाडी, ता. लांजा) हे ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास शाळेत रजिस्टर भरण्यासह दैनंदिन शासकीय कामकाज करीत होते. यावेळी कुणाल शांताराम कुर्णेकर (वय ३८, रा. वेरळ गायदडीवाडी, ता. लांजा) हा मद्यप्राशन करून शाळेत आला. त्याने अचानक भागवत यांच्या अंगावर धाव घेत त्यांच्या डाव्या कानावर हाताने थप्पड मारली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहशिक्षकाची शर्टची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तसेच भागवत यांचाही शर्ट पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शाळेतील नियमित शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
या प्रकरणी शिक्षक नंदकुमार भागवत यांच्या तक्रारीवरून कुणाल कुर्णेकर याच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, १३१, १२१(१), ३५२, ३५१(२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.


