(सिंधुदुर्ग / सावंतवाडी)
सावंतवाडी-बाहेरचावाडा परिसरातील एका कुटुंबाची कार आंबोली घाटात भीषण अपघातात दरीत कोसळली. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या धबधब्याच्या दरीत पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हा अपघात बुधवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता घडला. कारमध्ये चालक शहबाज रखानजी (35), अमन बेग (22), नजीम सय्यद (35) आणि अब्रार चौधरी (25) हे प्रवास करत होते. घाटातून प्रवास करत असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार खोल दरीत कोसळली. अपघात घडताना परिसरात उपस्थित प्रवासी आणि पर्यटकांनी ही घटना पाहिली आणि तत्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढण्यात मदत केली.
घटनेची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली. त्याच वेळी कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने येणारे माजगाव येथील संदीप कोटकर यांनी मदतीचा प्रयत्न केला. नेटवर्कअभावी कॉल न लागल्याने त्यांनी थेट आंबोली पोलिस चेक पोस्ट गाठून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच आंबोली पोलिस चेक पोस्टवरील कर्मचारी रामदास जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत कोसळलेल्या कारमधील सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, एका युवतीलाही किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलिसांचे मदतकार्य सुरू असून पुढील तपास आंबोली पोलिस करत आहेत.

