( पुणे )
बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला दरीत ढकलून ठार मारण्यापूर्वी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका टेकडीवर हत्या करण्याचा सराव केल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास पथकाने संबंधित टेकडीवर जाऊन घटनास्थळाची पडताळणी केली असून, आरोपींच्या हालचालींचा तपास सुरू आहे.
याचबरोबर, तपासातील विसंगती दूर करण्यासाठी आणि आरोपींच्या जबाबांची वैज्ञानिक पडताळणी करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर) चाचणी करण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींची चाचणी केली जाणार आहे.
लुल्लानगरच्या टेकडीवर हत्या करण्याचा ‘सराव’?
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एरिया 37 हॉटेलच्या मागील टेकडीवर आरोपी सिया गोयलने केतन अग्रवालला दरीत ढकलण्याचा सराव केल्याचा संशय आहे. ही टेकडी सियाच्या राहत्या घराजवळ असल्याने पोलिसांनी गुरुवारी आरोपीला तेथे नेऊन तपास केला. या ठिकाणी प्रत्यक्ष सराव झाला होता का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिस विविध पुरावे गोळा करत आहेत. यापूर्वी बुधवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळाचे पुनर्निर्माण (Scene Recreation) केले होते.
पॉलीग्राफ चाचणी का महत्त्वाची?
तपासात आरोपींनी दिलेल्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. घटनाक्रम, उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे, डिजिटल माहिती आणि आरोपींच्या कथनातील तफावत यांची वैज्ञानिक पडताळणी करण्यासाठी पॉलीग्राफ चाचणीचा आधार घेतला जाणार आहे. चाचणीनंतर आरोपींचे जबाब पुन्हा नोंदवून त्यांची आधीच्या जबाबांशी तुलना केली जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) गजानन टोणपे यांनी सांगितले की, हा तपासाचा नियमित भाग आहे. पॉलीग्राफ चाचणीचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नसला, तरी त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळू शकते. त्यामुळे 3 जुलै रोजी न्यायालयाकडे आवश्यक परवानगी मागितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले?
तपास पथकाने आतापर्यंत घटनास्थळाचे पुनर्निर्माण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी केली आहे. आता पॉलीग्राफ चाचणी हा तपासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्यातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, तपासादरम्यान हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचा संशय बळावला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता. त्यावेळी फोटो काढण्याच्या बहाण्याने सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपींच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानंतर तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
या प्रकरणाचा तपास सध्या पुणे ग्रामीण पोलीस वेगाने करत असून, पुढील तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

