(पनवेल / रायगड)
पनवेल शहरातून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलीला प्रलोभन दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 24 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी पीडित मुलगी परिसरात खेळत होती. त्यावेळी तेथील 24 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने हातवारे करून तिला जवळ बोलावले. त्यानंतर तिला परिसरातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात नेण्यात आले. आरोपीने शौचालयाचा दरवाजा आतून बंद केल्यानंतर मुलीसोबत अश्लील कृत्य आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, सार्वजनिक शौचालयाच्या परिसरातील संशयास्पद हालचाली एका स्थानिक नागरिकाच्या लक्षात आल्या. परिस्थितीचा संशय आल्याने नागरिकाने शौचालयाच्या दरवाजावर ठोठावून आतमध्ये कोण आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाल्याने परिसरातील इतर नागरिकही घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडल्यानंतर पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली. तर आरोपीने दरवाजाच्या मागे लपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवले आणि तातडीने पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या ताब्यातून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सार्वजनिक शौचालये आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

