(मुंबई)
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील स्टार जोडपं, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी वैयक्तिक कारणांमुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सायनाने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करून घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. २०१८ मध्ये विवाहबद्ध झालेले हे यशस्वी जोडपं तब्बल सात वर्षांनंतर वेगळं झालं आहे.
सायना आणि कश्यप यांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत एकत्र प्रशिक्षण घेत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांची ओळख जुळत गेली आणि अनेक वर्षांच्या सलोख्यानंतर त्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला होता.

सायनाची भावनिक पोस्ट…
इंस्टाग्राम स्टोरीत सायनाने लिहिले : “कधी कधी आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचारांती आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांतता, प्रगती आणि समाधान यांची निवड करत आहोत. एकमेकांबद्दल कृतज्ञता बाळगत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा.”
या निर्णयामुळे दोघांचे चाहते अस्वस्थ झाले असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अद्याप पारुपल्ली कश्यपने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
क्रीडा क्षेत्रात दोघांची दैदिप्यमान वाटचाल
सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटनचा प्रमुख चेहरा मानली जाते. ती ऑलिम्पिक पदक विजेती आणि जगातील क्रमांक एकची शटलर ठरलेली पहिली भारतीय महिला आहे. तिने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि २०१५ मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. एवढंच नाही तर, सायना BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.
तर पारुपल्ली कश्यप याने २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. २०१० मध्ये दिल्ली कॉमनवेल्थमध्ये कांस्यपदक तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला.
२० वर्षांची मैत्री ते वैवाहिक जीवन
सायना आणि कश्यपची पहिली भेट १९९७ मध्ये एका प्रशिक्षण शिबिरात झाली होती. २००४ पासून दोघांनी गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच जवळीक वाढली. २०१८ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नाआधी त्यांचे नाते खासगी ठेवण्यात आले होते.

