(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर एक्स-रे काढण्यासाठी रत्नागिरीला जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेली २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. जान्हवी समीर भाटकर असे या महिलेचे नाव असून, त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत. नातेवाईकांनी परिसरासह रत्नागिरी, गणपतीपुळे, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जान्हवी भाटकर या चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या होत्या. तेथून गुडघ्याचा एक्स-रे काढण्यासाठी रत्नागिरी येथे जात असल्याचे सांगून त्या एसटी बसमध्ये बसून निघाल्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. जान्हवी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. आजूबाजूचा परिसर, रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्या कुठेही आढळून आल्या नाहीत.
अखेर काजल संदेश सर्वे (वय २२, रा. बागपाटोळे, तोणदे, ता. जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जान्हवी यांचे अपहरण करून त्यांना पळवून नेल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता जान्हवी भाटकर यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


