(मंडणगड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
कुत्र्याला का मारले, असा जाब विचारत झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना मंडणगड तालुक्यातील सडे जाधववाडी येथे घडली. कापलेल्या भाताची राखण करीत असलेल्या ६४ वर्षीय वृद्धाला तिघांनी मिळून मारहाण केली. यावेळी एका संशयिताने हातातील काठीने वृद्धाच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केले, तर अन्य दोघांनी ठोशांनी मारहाण करीत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम परशराम जाधव (वय ६४, रा. सडे जाधववाडी, ता. मंडणगड) हे २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सडे जाधववाडी येथील बंद असलेल्या अंगणवाडीच्या आवारात त्यांच्या साडू दिनकर सिताराम पवार यांच्या कापलेल्या भाताची राखण करीत होते. यावेळी अल्पेश सोपान जाधव तेथे आला. ‘तू माझ्या कुत्र्याला का मारलेस?’ असा जाब विचारत त्याने दत्ताराम जाधव यांच्याशी बाचाबाची सुरू केली. हा वाद सुरू असतानाच वाडीतील समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव हेही घटनास्थळी आले. तिघांमधील वादाचे पर्यवसान धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. यावेळी अल्पेश जाधव याने हातातील काठीने दत्ताराम जाधव यांच्या डोक्यावर, कपाळाच्या वरील बाजूस वार केला. तर समाधान जाधव आणि सोपान जाधव यांनी हाताच्या ठोशांनी त्यांना मारहाण केली. याशिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दत्ताराम जाधव यांच्या तक्रारीवरून अल्पेश सोपान जाधव, समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव (सर्व रा. सडे जाधववाडी, ता. मंडणगड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.


