(संगमेश्वर / एजाज पटेल)
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासोबतच त्यांच्यातील गणिती कौशल्य आणि पाठांतर क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने साखरपा बीटस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते सातवीच्या वर्गांमधील तब्बल ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चाळीसपर्यंतचे पाढे आत्मविश्वासाने आणि कोणतीही चूक न करता म्हणून दाखवत उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण १४ महिला शिक्षिकांनी केले.
महात्मा गांधीजी यांच्या शाळा ही केवळ ज्ञान देणारी जागा नसून विविध उपक्रमांचे केंद्र असावे, या विचाराला अनुसरून साखरपा बीटाचे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. साखरपा नं. १ येथील बीट शाळेच्या प्रांगणात हा शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि आकलनशक्ती वाढविण्यासाठी शाळांमध्ये नियमित पाढे पाठांतर घेतले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने साखरपा बीटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत साखरपा केंद्र क्रमांक १ व २, किरबेट, वांझोळे आणि मारळ या पाच केंद्रांमधील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाढ्यांमधील अचूकता आणि आत्मविश्वास विशेष लक्षवेधी ठरला. स्पर्धेचे परीक्षण १४ महिला शिक्षिकांनी जबाबदारीने केले. या उपक्रमासाठी श्री. मंगेश दळवी, श्री. लक्ष्मण कदम आणि श्री. अमोल लाड यांनी शैक्षणिक वस्तूरूपाने मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेतील प्रत्येक इयत्तेतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. इयत्ता पहिलीमध्ये सौजन्य नाईक (कुड्याचा माच), माही घडशी (कनकाड गोताडवाडी) आणि अद्वैत कात्रे (पुर्ये) यांनी यश मिळविले. इयत्ता दुसरीमध्ये युग आणेराव (आंगवली), ओवी सावंत (कोंडगाव) आणि सार्थक करंबेळे (कासार कोळवण) यांनी यश संपादन केले.
इयत्ता तिसरीमध्ये प्रज्ञेश पाटील (ढवळवाडी), कार्तिक राबांडे (ढवळवाडी) आणि आर्या पवार (किरबेट) यांचा समावेश आहे. इयत्ता चौथीमध्ये विहान कानडे (मोर्डे), स्वराज पांगळे (पुर्ये) आणि आरूष भोवड (पुर्ये) यांनी यश मिळविले. इयत्ता पाचवीमध्ये पार्थ तांदळे (गोताडवाडी), चैतन्य शिंदे (साखरपा नं.१) आणि स्वरा सावंत (कोंडगाव) यांनी बाजी मारली.
इयत्ता सहावीमध्ये गौरवी कानडे (मोर्डे), श्रुती अडबल (बोंड्ये) आणि विरेन कबाडे (साखरपा नं.१) यांनी यश संपादन केले. इयत्ता सातवीमध्ये पार्थ सावंत (साखरपा नं.१), स्वरा धावडे (करंबेळे), जीत जोशी (कनकाडी) आणि मनस्वी कोलापटे (पुर्ये) यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी तानाजी नाईक सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. एका साध्या; परंतु प्रभावी शैक्षणिक संकल्पनेतून बीटातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि संगमेश्वर तालुक्यातून कौतुक होत आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र समन्वयक सौ. दिव्या भाटकर, श्री. बाबासो यादव, श्री. तुकाराम शिंदे आणि श्री. संजय घुटे यांनी सहकार्य केले. यावेळी श्री. रूपेश जाधव, श्री. नथू सोनवणे, श्री. शशिकांत कांबळे, श्री. रोहिदास मांडवकर, श्री. धनाजी मोठे, श्री. मच्छींद्र लाड, श्री. मंगेश सागवेकर, सौ. विद्या माने यांच्यासह शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक बाबासाहेब लाड यांनी केले, तर विलास कानर यांनी आभार मानले.


