राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना यापुढे कुठलीही कृषी योजना आणि महाडीबीटी पोर्टलवरील ज्या काही अनुदानित योजना आहेत त्यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. याच फार्मर आयडी संदर्भात एक महत्त्वाचे प्रसिद्धीपत्र कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले असून त्या माध्यमातून काही स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत.
कृषी विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फार्मर आयडी मिळाल्यानंतर सातबारा, ८ अ उतारा किंवा अन्य कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज उरत नाही. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून अजूनही शेतकऱ्यांकडून या कागदपत्रांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत कृषी विभागाने स्पष्ट आदेश देत म्हटले आहे की, फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांकडून इतर कागदपत्रे मागवू नयेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
प्रमुख मुद्दे :
-
कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक.
-
एकदा फार्मर आयडी मिळाल्यानंतर इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही.
-
शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार.
-
शेतकऱ्यांनी अशा प्रकरणात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी आयुक्त डॉ. सुरज मांढरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, अलीकडे झालेल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रे मागवली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
फार्मर आयडी ही एक डिजिटल ओळख असून, त्यामध्ये शेतकऱ्याची सर्व शेतीविषयक माहिती समाविष्ट असते. त्यामुळे ती सादर केल्यानंतर कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा दस्तऐवज देण्याची आवश्यकता उरत नाही, असेही डॉ. मांढरे यांनी स्पष्ट केले.