(अलिबाग)
मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड डॅम येथे वर्षासहलसाठी आलेल्या पर्यटकांच्या गटात एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरी (मुंबई) येथील साहिल राजू रणदिवे (वय २४) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांमध्ये शोककळा पसरली आहे.
रविवारी, १३ जून रोजी अंधेरीतील अकरा जणांचा एक गट बोर्ली मार्गे फणसाड डॅमवर वर्षासहलसाठी पोहोचला होता. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साहिल रणदिवे डॅमच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. काही क्षणांतच तो अचानक बेपत्ता झाला. याबाबत दीपक नारायण पांचाळ (रा. अंधेरी, मुंबई) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात हरवल्याची (मिसिंग) तक्रार दाखल केली. सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली आणि अखेर साहिलचा मृतदेह डॅमच्या पाण्यात आढळून आला.
या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक म्हशीलकर करीत आहेत. फणसाड डॅम परिसरातील पाण्यातील सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत चौकशी करण्यात येत आहे.