(मुंबई)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) 2024 पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. 29 जून रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल 17 सप्टेंबरला प्रसिद्ध झाला असून पात्र उमेदवारांची यादी आणि कट-ऑफ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आता पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि मुलाखतीच्या टप्प्यांमधून जावे लागणार आहे.
कट-ऑफमध्ये झपाट्याने वाढ
निकालातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या वाढलेल्या कट-ऑफ गुणांची. ओपन प्रवर्गात मुलांचे कट-ऑफ 292.50, तर मुलींचे 275.50 इतके ठरले. ओबीसी प्रवर्गासाठी मुलांचे कट-ऑफ 276, तर मुलींचे 255.50 गुण नोंदले गेले. एससी, एसटी, एनटी, डीटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि अनाथ प्रवर्गासाठी स्वतंत्र कट-ऑफ जाहीर झाले आहेत. यामधून उमेदवारांची संख्या आणि गुणवत्ता वाढल्याचे स्पष्ट दिसत असून, स्पर्धाही अधिक तीव्र झाली आहे.
रिक्त पदांचा प्रश्न कायम
वाशी येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासिका स्नेहा जाधव हिने सांगितले की, “फक्त पीएसआय पदासाठीच नव्हे, तर महाराष्ट्र पोलीस दलात एकूणच मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 15,600 पेक्षा अधिक पदे सध्या रिकामी आहेत. यामध्ये पोलीस शिपाईपासून ते अधिकारी स्तरापर्यंत सर्व पदांचा समावेश आहे. परंतु, भरती प्रक्रिया बहुतेकदा संथ गतीने सुरू राहते. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर शारीरिक चाचणीसाठी आता दिवाळीनंतरच्या तारखा दिल्या जातील,” असे ती म्हणाली.
पीएसआय पदांची सद्यस्थिती
एमपीएससीमार्फत पीएसआय पदासाठी स्वतंत्र भरती होत असते. 2024 च्या जाहिरातीनुसार 200 ते 250 पदे उपलब्ध आहेत. तथापि, कॉन्स्टेबल ते पीएसआयपर्यंतची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू राहते.
पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता
एमपीएससीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “संयुक्त राष्ट्रांच्या शिफारशीनुसार प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 222 पोलीस असणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रमाण यापेक्षा लक्षणीय कमी आहे. देशाच्या सरासरीपेक्षा (152–156) महाराष्ट्र थोडा पुढे असला तरी प्रत्यक्षात 10–12 टक्के पदे रिक्त आहेत. गुन्ह्यांची वाढती संख्या, ट्रॅफिक व्यवस्थापन, सायबर गुन्हे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे पोलिसांवर ताण सतत वाढतो. त्यामुळे फक्त संख्याबळ नव्हे, तर दर्जेदार प्रशिक्षण असलेले सक्षम पोलीस दलही तितकेच आवश्यक आहे.”

