(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूर तालुक्यातील एका लॉजवर महाड तालुक्यातील करंजखोल गावातील एका विद्यार्थिनीशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलादपूर पोलिसांनी मुख्य आरोपीला नाशिक येथून अटक करून महाड न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील करंजखोल येथील पीडित विद्यार्थिनीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून 21 डिसेंबर 2024 ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेले. पोलादपूर येथील लॉज, महाडमधील लॉज तसेच ठाणे आणि नाशिक येथील लॉजवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतरही अत्याचार सुरूच ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रसाद जिभाऊ नाडेकर (वय 23, रा. संत सावरकर नगर, पेठ रोड, नाशिक) याला अटक केली. आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 06/2026 नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश आर. मुंढे यांनी केली. आरोपीला महाड न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलादपूर पोलीस करत असून, आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

