(संगमेश्वर / एजाज पटेल)
महामार्गालगतचे मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे संगमेश्वर येथील एसटी बसस्थानक सध्या सुरक्षेअभावी चर्चेचा विषय ठरत आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या या स्थानकातून कोकणातील ग्रामीण भागासह मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस नियमित धावतात. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या बसस्थानकाची इमारत पाडून कोट्यवधी रुपये खर्चून भव्य, सुसज्ज आणि प्रशस्त बसस्थानक उभारण्यात आले. या स्थानकाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. उद्घाटनावेळी एसटी प्रशासनाकडून सुविधा, सुरक्षितता आणि शिस्त यांची हमी देण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच ही आश्वासने केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत आहे.
पोलीस चौकी केवळ शोभेची?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानक परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी ही चौकी महत्त्वाची मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही चौकी बहुतांश वेळा कुलूपबंद असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस उपस्थिती नसणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याची भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
चोरी, पाकिटमारी, महिलांशी गैरवर्तन किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास तात्काळ तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस उपलब्ध असणे आवश्यक असते. पण चौकीच बंद असल्याने प्रवाशांनी मदतीसाठी धाव घ्यायची तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट्यवधी खर्च… पण सुरक्षेचा पत्ता नाही
भव्य इमारत, आकर्षक रंगरंगोटी आणि उद्घाटनाचा गाजावाजा यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष व्यवस्थापन किती सक्षम आहे, हा खरा मुद्दा असल्याचे नागरिक सांगत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले बसस्थानक जर सुरक्षेअभावी असुरक्षित ठरत असेल, तर हा खर्च नेमका कोणासाठी, प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
महामार्गालगतचे हे बसस्थानक केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचे आहे. अशा ठिकाणी पोलीस चौकी कुलूपबंद असणे म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण असल्याची टीकाही होत आहे.
तातडीच्या कार्यवाहीची मागणी
संगमेश्वर बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी, सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची ठोस हमी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे, असा इशाराही देण्यात येत आहे. कोट्यवधींच्या विकासकामांचा गवगवा करण्यापेक्षा त्या सुविधांचा प्रत्यक्ष उपयोग आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा ‘भव्य’ बसस्थानकाची ओळख ‘असुरक्षित’ अशीच राहील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

