( रत्नागिरी )
रत्नागिरी मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली असून, पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या पर्यटकाचा जीव स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले. रहीम मिसाक्शीर असे या पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या मुलासोबत मजा म्हणून मासेमारीसाठी मिऱ्या येथील भारतीय शिपयार्ड बोलाड परिसरात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राला जोरदार उधाण आलेले असतानाही ग्रामस्थांनी धोका असल्याचा इशारा देऊनही रहीम मिसाक्शीर यांनी मासेमारी सुरू ठेवली. याचदरम्यान अचानक आलेल्या एका प्रचंड लाटेने त्यांना समुद्रात उडवून दिले. लाटांच्या तडाख्याने ते किनाऱ्यावरील खडकांवर आपटत होते आणि बुडण्याच्या स्थितीत आले होते.
यावेळी अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ धाव घेतली आणि समुद्रात उतरत रहीम यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्याच्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कापडगाव येथील एका तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता. त्यांनी वारंवार धोक्याची सूचना देत असतानाही अनेक पर्यटक आणि नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा घटना घडतात, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. आज मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एक जीव वाचला आहे.

