(रत्नागिरी)
आपल्या भारतीय संस्कृतीच्या गुरु परंपरेतील महर्षि पतंजलि यांनी योगशास्त्र अगदी सोप्या पद्धतीने ग्रंथांच्या द्वारे जनमानसासमोर ठेवले. सध्या अनेक प्रकारच्या व्याधी अगदी लहान वयातच होताना आपण पाहतो त्यामुळे जीवन व्याधीमुक्त करण्याची ताकद योग मध्ये आहे. जागतिक स्तरावर भारताच्या योग विद्येला मान्यता मिळाली ही निश्चितच भारतासाठी कौतुकास्पद बाब आहे. मात्र योग साधकांनी आता ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत योग व त्याचे महत्व पोहोचवण्याचा निर्धार करावा असे प्रतिपादन महिला पतंजलि योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांनी केले. त्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘गुरुवंदन’ कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महर्षि व्यास, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे , महाकवी कालिदास, सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. आपल्या प्रास्ताविकात बोलताना रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, सदाशिवापासून सुरू झालेल्या गुरुपरंपरेद्वारे भारतीय संस्कृतीला तत्त्वज्ञान, शास्त्रे यांचा संग्रह देऊ केला. गुरु शिष्याचे नाते आपण भारताच्या कानकोपऱ्यात पदोपदी बघतो. आजच्या युगात विविध क्षेत्रात भारत विश्वाचे प्रतिनिधित्व करतो आहे त्यामुळे एकप्रकारे भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा जगासाठी प्रेरणादायक आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि महर्षि व्यास यांचा जन्मोत्सव ,गुरुपौर्णिमेचे औचित्य रत्नागिरी जिल्ह्यातील योग क्षेत्रातील मान्यवरांना गुरुवंदन करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात नीता साने, ज्योति गावंड, समृद्धी दळी, प्रा.डॉ. निधी पटवर्धन, अॅड. विद्यानंद जोग, राजेश आयरे, विनय साने, प्रियांका एकावडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, डॉ. शशांक पाटील, अॅड. रुची महाजनी, श्रीकांत ढालकर प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, प्रा. सई ओक, स्वरूप काणे यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय बी दि चेंज फाऊंडडेशन शिर्डी यांच्याकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. डॉ. निधी पटवर्धन, नीता साने, समृद्धी दळी, डॉ. शशांक पाटील, सिद्धी कोळेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले. प्रा. अविनाश चव्हाण यांनी आभार मानले.

