(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये खासगी सावकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बँका व पतसंस्थांकडून कर्ज मिळवणे कठीण असल्याने, छोटे व्यावसायिक, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले नागरिक खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकत आहेत. या सावकारांकडून मासिक ३० ते ४० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने पैसे वसूल केल्याची जोरदार चर्चा आहे.
‘सावकारी अण्णांची’ कीड गावोगाव
तालुक्यात विविध सरकारी बँका व सहकारी पतसंस्था कार्यरत असल्या तरी गरीब व गरजूंना त्या सहज उपलब्ध होत नाहीत. कर्ज मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रक्रिया व अटी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण सावकारांच्या पाशात अडकतात. या अडचणींचा फायदा घेत काही ठरावीक सावकारांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून आपले जाळे गावोगावी पसरवले आहे.
अवाढव्य व्याजदर आणि आर्थिक छळ
तालुक्यातील छोटे दुकानदार, रिक्षा-वाहनचालक आणि फेरीवाले यांच्यासाठी खासगी सावकार हे ‘शॉर्टकट’ समाधान वाटते. पण एकदा कर्ज घेतल्यावर त्यातून सुटका जवळपास अशक्य होते. अनेक वेळा ३९ ते ४० टक्क्यांपर्यंत मासिक व्याज आकारण्यात येते. व्यवसायातून मिळणारा सारा नफा या सावकारांच्या व्याज व हप्त्यांमध्येच गिळंकृत होतो. “व्यवसाय आपण आपल्यासाठी करतो की सावकारांसाठी?” असा सवाल आता अनेक व्यावसायिकाना पडला आहे.
मजुरांचेही शोषण
तालुक्यातील मजूर वर्गही सध्या मोठ्या प्रमाणावर सावकारांच्या कर्जात अडकलेला दिसतो. पावसाळ्यात कामाची टंचाई असल्याने रोजच्या गरजांसाठीही या वर्गाला सावकारांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी त्यांच्या मेहनतीची पराकाष्ठा होत असून, संपूर्ण पगार फक्त व्याज फेडण्यात जातो. काही गावांत तर मजुरांना कर्ज देणाऱ्या टोळ्याच सक्रिय असल्याचे स्थानिक सांगतात.
सावकारी मागे संघटित गुन्हेगारी?
अनेक खासगी सावकार हे एकमेकांशी संलग्न असून वसुलीसाठी ते परस्परांना साथ देतात. दमदाटी, धमकी, सामाजिक दबाव किंवा सार्वजनिक अपमान करून वसुली करण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे अशा सावकारांच्या टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर समस्येवर स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अनेक निरपराध कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.