(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील मिळंद गावात मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उपक्रमांतर्गत स्वाधार फिनिक्सेस या स्वयंसेवी संस्थेमार्फत आर्थिक साक्षरता व डिजिटल जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बँकांच्या विविध योजना, डिजिटल व्यवहारांची माहिती तसेच ऑनलाइन फसवणूक कशी होते आणि ती टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
स्वाधार फिनिक्सेस या एनजीओचे वैभववाडी येथे आर्थिक साक्षरता केंद्र असून, या केंद्राच्या माध्यमातून वैभववाडी, राजापूर आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये नियमितपणे आर्थिक साक्षरता, डिजिटल अवेअरनेस आणि बँक योजनांबाबत जनजागृती केली जाते. मिळंद येथे झालेल्या या कार्यक्रमात पीपीटी व व्हिडीओच्या साहाय्याने फसवणुकीचे प्रकार, सायबर गुन्ह्यांची पद्धत आणि नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदाऱ्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. यावेळी श्री. योगेश पाटील आणि महेश रावराणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस सरपंच किर्ती आयरे, उपसरपंच रवींद्र गुरव, जामदा खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहासभाई आयरे, मिळंद हायस्कूलचे मुख्याध्यापक योगेश आयरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप आयरे, गावचे पोलीस पाटील प्रवीण मोरे, मिळंद प्रगती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुनील मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आयरे, अंगणवाडी सेविका जानवी गुरव यांच्यासह ग्रामस्थ आणि बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहार आणि डिजिटल सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

